Monday, 10 February 2020

टेस्टी टेस्टी

दुदू, बनाना, चिकू आणि भातु खूप छान लागतात, पण त्याहून छान काय लागतं माहितेय का तुम्हाला?
.
आईचे कपडे, तिचे हात, बाबांचा टीशर्ट, ब्लॅंकेट, बेडशीट, माझा जिराफ, माकड, उंदीर..

Monday, 25 November 2019

पॅसिफायर

पॅसिफायर काढलं की आई लगेच येऊन देते म्हणून स्वतः च्या मुठीत ते धरून ठेवून मी उगाच उह उह करीत राहतो आणि आई येताच मला हसू फुटते, मग स्वतःच पॅसिफायर परत तोंडात टाकून परत चावायला लागतो.

ही एक प्रक्रिया मी सतत करतो आणि आई दरवेळी येतेच माझ्याकडे. हुशार आहे की नै मी!

बाय द वे, मी आता लवकरच ४ महिन्यांचा होईन.

Monday, 18 November 2019

सकाळची मस्ती आणि माझी नखं

बाबा - केवढा मस्ती करतो ना हा आता, सकाळी सकाळी तर super excited असतो

आई - हो ना, दंगा करतो नुसता, हिहीही आणि खुखुखु सुरूच असते

बाबा - मग आहेच आपला छावा जोशपूर्ण

मी - (मनातल्या मनात) म्हणे छावा, दर चार दिवसांनी माझी नखं बारीक कापून टाकतात हे लोक, साधं बोचकारू पण देत नाहीत...😑

Friday, 25 October 2019

मलाला उलुलुलु

मी - मलाला उलुलुलु

दाढीवाला - नवीन उच्चार जमताहेत बघ पिल्लू ला, वेगवेगळे आवाज काढतोय रोज

मी - मलाला उलुलुलु

पप्पी घेणारी बाई - किती छान ना, बाळाच्या भाषेला कुणी डिकोड करू शकले तर ते काय गमतीजमती सांगताहेत ते कळेल आपल्याला नै

मी - मलाला उलुलुलु (अरे मला उचलून घ्या, कंटाळा आलाय लोळायचा!)


Wednesday, 16 October 2019

कन्फ्युजन......

बाबा - गुच्चू, झिंटू, पुट्टू, माझं पिल्लु, गुज्जुबज्जू, मुंटा पिंटा, कुट्टू, मुंडा, झुंडूमुंडू, अरे माझ्या मुला गुलाबाच्या फुला..

आई - गुंडू, बबलू, बबुडी, बच्चू, पिल्लू, शोनू, छुनकु, बबलडू, गुड्डू, हुश्शू, माऊ, छावा, नोनू, चिंटू, टिंकुडी, अनिमनिछोनी..

मी - माझं नाव नक्की काय आहे?

🤔

बचाव बचाव

आमच्या घरात दोन डेंजर लोक राहतात, येता जाता माझ्या पप्प्या घेत असतात, गालावर, हातावर, पायावर, डोक्यावर..
.
मी सॉलिड चक्रावलो की आता कसं रोखू या लोकांना.. आय मीन, ते वेळेवर दूध देतात, झोपवतात, गाणी वगैरे पण म्हणतात, पण दोघेही पप्प्या फार घेतात राव..
.
मग एक आयडिया केली, हळूच वळून पालथा झोपलो, म्हटलं आता यांना काही करता येणार नाही.. तर "अय्या किती छान वळले माझे पिल्लू.." असं म्हणत माझ्या  फूड सप्लायर बाईंनी माझ्या पाठीच्या ढीगभर पप्प्या घेतल्या..
.
शप्पथ! काहीही प्रायव्हसी नाहीये ओ मला..

😁😘🤣

बाबांचा अंदाज

दाढीवाला (बाबा)- भरपूर दूध प्यायला आहे बच्चू, आता 4 तास तरी झोपेल बघ हा

फूड सप्लायर (आई)- होय, आपण पण झोपून घेऊ आता निवांत

मी - (पलीकडे गादीवरुन एक डोळा किलकिला करून बघत) हे दोघे गाढ झोपले रे झोपले की मी लग्गेच जोरात ओरडणार आहे दुदू पाहिजे म्हणून.. हीहीही..

🙄😁